नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी दणदणीत पराभव करत पराभव करत 17 गुणांसह आयपीएल-16 च्या प्लेऑफमध्ये धडक मारली. यासह चेन्नई हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सनंतर प्लेऑफ गाठणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे गुजरात-चेन्नई संघातच यंदाचा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांच्या अर्धशतकी 141 धावांच्या भागीदारीच्या बळावर चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र चेन्नईच्या दिपक चहर(3-22), महिशा थिकशाना(2-23) व मिथेशा पाथिराना(2-23) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीचा गाशा 146 धावातच गुंडाळला गेला. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (86-56 चेंडू) दिलेली एकतर्फी झुंज व्यर्थ ठरली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचे सलामीवीर गायकवाड – कॉनवे यांनी 14.2 षटकांत चेन्नईला 141 धावा उभारून दिल्या. दोघांव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (20) व शिवम दुबेने(22) शानदार कामगिरी केली. तर दिल्लीकडून सकारिया, नॉर्किया व अहमद यांनी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज ः 20 षटकांत 3 बाद 223 (ऋतुराज गायकवाड 79-50 चेंडू, डेव्हॉन कॉनवे 57-52 चेंडू, शिवम दुबे 22, रविंद्र जडेजा 20; चेतन सकारिया 1-36, एनरिक नॉर्किया 1-43, खलील अहमद 1-45) विजयी वि. दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकांत 9 बाद 146 (डेव्हिड वॉर्नर 86-58 चेंडू, यश धुल 13, अक्सर पटेल 15; दिपक चहर 3-22, मिथेशा पाथिराना 2-23, महिशा थिकशाना 2-23, तुषार देशपांडे 1-26, रविंद्र जडेजा 1-50).
हंगामातील चौथी मोठी भागीदारी
कॉनवे व गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी 87 चेंडूत 141 धावांची भागीदारी केली. आयपीएल 2023 मधील ही चौथी सर्वात मोठी भागीदारी ठरली. कॉनवेने 11 चौकार व 3 षटकारांसह 52 चेंडूत 87 धावा केल्या. त्याचवेळी, गायकवाडने 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. गायकवाडने 158 च्या तर कॉनवेने 167.31 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.