नवी दिल्ली – काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे.अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना कार्यक्रमाची पत्रिका मिळाली असल्याची माहिती काँग्रेसच्या मिडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दुजोरा दिला आहे. तर, अधीर रंजन चौधरी यांनी स्वतः ते कार्यक्रमाला जाणार असल्याचे म्हटले आहे.
जयराम रमेश म्हणाले की, दोन्ही नेत्यांना आमंत्रण मिळाले आहे. मात्र यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि सर्वांना कळविण्यात येईल, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे राम मंदिर सोहळ्यासाठी हजर राहणार असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता गांधी कुटुंबीय या सोहळ्यासाठी हजर राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.