गोल्ड मायनिंग स्टॉक्‍समधली गुंतवणूक फायदेशीर

नवी दिल्ली – आर्थिक अस्थिरतेच्या काळात शेअर्स, जमीन की सोने-चांदी यामधली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, याविषयी चर्चा सुरु असतानाच दिल्लीतील अर्थतज्ज्ञांच्या एका गटाने सांगितले आहे की, सध्या गोल्ड मायनिंग स्टॉक्‍समधली गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते. हे स्टॉक सोन्याच्या खाणींमध्ये पैसा गुंतवतात. अनेकदा बाजारातल्या सोन्याच्या तुलनेत हे भाग मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. अर्थातच खाणीत झालेल्या अपघातासारख्या एखाद्या कारणानं ते खालीही येऊ शकतात, ही यातली महत्त्वाची जोखीम आहे.

गोल्ड स्ट्रिमिंग कंपन्यांमधली गुंतवणूक या तुलनेत कमी जोखमीची असते. या कंपन्या थेट खाणींमध्ये गुंतवणूक न करता खाणकाम करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत देतात आणि बदल्यात त्यांच्या नफ्यात आपला हिस्सा ठेवतात. याखेरीज गोल्ड म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येते. या पर्यायात तुम्ही म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक फंड सोन्याच्या ईटीएफमध्ये करतात.

या गुंतवणुकीत दागिन्यातल्या खरेदीला सगळ्यात शेवटचा क्रमांक दिला जातो. कारण तरलतेचा विचार केला, तर दागिने लगेच विकले जातात, मात्र घडणावळीचा खर्च विचारात घेता ही गुंतवणूक कमी फायद्याची ठरते. दागिने वापरून प्रत्यक्ष सोन्याचा वापर करण्याची इच्छा असेल, तर दागिन्यात गुंतवणूक करावी, अन्यथा सोन्याचे इतर पर्याय विचारात घ्यावेत असा सल्ला नेहमीच दिला जातो.

एकूणच, सोन्या-चांदीतली गुंतवणूक यंदा फायद्याची ठरू शकेल असा या तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र तरीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपली गरज आणि गुंतवणुकीतून असलेल्या अपेक्षा यांची सांगड घालून निर्णय घेणं केव्हाही अधिक योग्य ठरतं, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.