न्यूयॉर्क – जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे आणि सर्वदूर पसरलेले इलेक्ट्रॉनिक साधन असा आपला लौकिक सेलफोनने आजही टिकवून धरला आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये काय, लहान गावांमधूनही डेस्कटॉप कॉंप्युटर वेगाने दिसेनासा होत आहेच. आजकाल अनेक जण सार्वजनिक ठिकाणीही लोक “व्हॉईस टायपिंग’ करताना दिसत आहेत. एकही कीबोर्डची कळ न दाबता, बरेचसे टायपिंग मोबाईलवर केले जाते. अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन लेखक आणि पत्रकार वेगाने लिहित आहेत. या संकल्पनेचा पुढचा विस्तार म्हणजे आगामी युग हे व्हॉईस कमांडचे असणार आहे.
संगणक आणि इंटरनेट यांचा संयोग असलेल्या स्मार्टफोन (आणि त्याचंच प्रगत रूप असलेला टॅबलेट पीसी)मार्फत वापरकर्त्याला मिळू शकणाऱ्या सुविधांची अक्षरशः गणतीच राहणार नाही! अशा रीतीने सर्व बाबी बसल्या जागी तेसुद्धा 24 तास हाताळण्याचं प्रतिबिंब आपल्या जीवनाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक पैलूंमध्ये दिसेल. अर्थात या सोयीसुविधा मिळवून देण्यामागे विविध ऍप्स उर्फ ऍप्लिकेशन्सचा फार मोठा वाटा असेल. ऍप्सचा हा उद्योग अतिशय वेगाने वाढेल आणि त्यामुळे विपणन-वितरण, विक्री, विक्रीपश्चात सेवा, जाहिरात, देखभाल या संदर्भातली सध्याची गणितं पूर्णपणे बदलतील. स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाशी संवाद साधणं अतिशय सुलभ होणार आहे. टचस्क्रीन तर बहुतेक ठिकाणी आत्ताच पोचला आहे परंतु साधनाशी थेट बोलण्याचं (व्हॉइस कमांड) प्रमाण खूपच वाढणार आहे. आपण या प्रकारे टीव्हीशीदेखील बोलू शकू.
संगणकीय प्रणालींमध्ये साठवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या माहितीच्या साठ्यामध्ये विलक्षण वाढ होईल (याला बिग डेटा असं म्हटलं जातं). ही माहिती व्यवस्थित साठवणं, हवी तेव्हा योग्य ती माहिती उपलब्ध करून देणं आणि तिचं सतत संपादन करणं हे अतिशय कौशल्याचं आणि कष्टाचं काम असणार आहे. या क्षेत्रातल्या कष्टांसाठी संगणकाच्या अफाट प्रोसेसिंग कपॅसिटीचा भरपूर वापर होणार असला तरी शेवटी मानवी कौशल्यांची गरज भासणारच. त्यामुळे माहिती प्रक्रिया क्षेत्रामध्ये रोजगार वाढणार, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांना खात्री वाटू लागली आहे.