शिक्रापूर -येथील करोडो रुपयांचे मूल्य असलेली गायरान जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामपंचायतीशी संबंधित एका सदस्याचा यामागे हात असून सदर जागा हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या परिसरातील रहिवाशांचा सार्वजनिक रस्ता बंद करत येथे संरक्षक भिंतीचे काम सुरु आहे. ही जागा पुणे-नगर महामार्गालागत आहे.
याबाबत शिक्रापूर येथील माळवस्ती व खरपुडे वस्ती येथील नागरिकांनी महसूल विभाग, स्थानिक ग्रामपंचायत व पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शिक्रापूर येथील अतिक्रमण झालेल्या गायरान जमिनीलगत खासगी क्षेत्र असल्याने त्याचा गैरफायदा घेत शासकीय जमिनीवर अंदाजे दहा गुंठे जमिनीवर ताबा घेण्यात आला आहे. या जागेवर बांधकाम व संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या जागेतून स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक रस्ता आहे.
त्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बाबत रहिवाशी प्रशासनाकडे दाद मागत आहेत. तर याबाबत शिक्रापूरचे ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे यांनी याबाबत संबंधिताना नोटीस बजावली आहे.
शिक्रापूर येथील जमीन गट नंबर 1113, 1114, 471, 472, 473, 474 व 475 या परिसरात सुरू असलेले बांधकाम सरकारी जागेत व सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजिनक जागेत विनापरवाना व बेकायदा बांधकाम सुरू आहे. ते तातडीनं थांबाविण्याची नोटीस संबंधितांना दिली आहे. त्यांच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रे असल्यास जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार कागदपत्रे ग्रांमपंचायतीला मिळाली असून नगर भू-मापन खात्याकडून मोजणी अहवाल प्राप्त झाल्यावर अतिक्रमणबाबत योग्य माहिती मिळेल.
– बी. बी. गोरे, ग्रामविकास अधिकारी शिक्रापूर.
येथील अतिक्रमणांबाबत ग्रामस्थांकडून अर्ज प्राप्त झाला असून तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश आल्यावर कारवाई करण्यात येईल.
– अविनाश जाधव, तलाठी.