पुणे (ज्ञानेश्वर फड) – 6 एप्रिल (6 April) हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस (International Sports Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आज आपण एका अशा खेळाडू काकांची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कॅरम खेळाला (Carrom Sport) समर्पित केले आहे. अशोक भिवबा केदारी (Ashok Bhivba Kedari) असे या काकांचे नाव असून त्यांनी 50 वर्षांच्या खेळाच्या कारकिर्दीत 400हून अधिक कॅरम स्पर्धांमध्ये (carrom competition) भाग घेतला आणि त्यातील 200हून अधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा जिंकून मिळालेली बक्षीसरूपी रक्कम त्यांनी स्वत:साठी न वापरता ती गरजूंना आणि शाळेला दान केली आहे. आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये मिळालेले दोन लाखाहून अधिक रुपये त्यांनी दान केले आहेत.
केदारी काका हे मुळचे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अमराळवाडी येथिल आहेत. पण ते लहानपणापासून पु्ण्यात राहतात. केदारी काकांनी सांगितले की, त्यांना लहानपणापासूनच कॅरम खेळाची आवड होती. ते राहत असलेल्या वाड्यात काहीजण कॅरम खेळत असत. त्यांचे वडील सुतार होते. त्यांनी वडिलांकडे हट्ट धरून कॅरम बनवून घेतला आणि खेळायला सुरुवात केली. खेळाची आवड एवढी वाढली की ते दिवसातील 6 ते 8 तास कॅरम खेळत असत. पुढे त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
जिद्द आणि कठोर मेहनतीमुळे ते ज्या स्पर्धेत भाग घेतील ती स्पर्धा बहुतांश वेळा तेच जिंकत असत. जिल्हा, राज्य, आंतरराज्य अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी विजय मिळविला. आजही ते कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि जिंकतात. सध्या काकांचे वय 70 वर्ष आहे. वयोमानामुळे ते आता फक्त पुण्यातील काही ठराविक ठिकाणीच कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेतात. सिंहगड परिसर क्लबतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये गेली 10 वर्षांपासून काकांना कोणीही हरवू शकले नाही. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाची होणारी वार्षिक कॅरम स्पर्धेतही गेली सलग 20 वीस वर्ष त्यांनीच विजेतेपद पटकावले आहे. दैनिक सकाळने आयोजित केलेली आंतरवृत्तपत्र कॅरम स्पर्धा सलग पाच वर्ष जिंकली. नवखे खेळाडू काकांचा खेळ पाहून अवाक् होत असतात.
केदारी काका हे आपली उपजिविका भागविण्यासाठी सुरुवातीपासून वर्तमानपत्रांमध्ये प्रुफ रिंडिंग या पदावर काम करतात. तरूण भारत, लोकसत्ता, प्रभात आदी दैनिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. कामाच्या व्यापामुळे त्यांना काही स्पर्धांमध्ये इच्छा असूनही भाग घेता आला नाही. आंतरराष्ट्रीय खेळण्याचीही त्यांची इच्छा अपूर्ण आहे. मात्र आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांची मुलगी मेघना केदारी यांना कॅरमची आवड लावली आणि उत्कृष्ट खेळाडू बनवले. मेघना यांनीही वडिलांच्या हातावर हात मारत कॅरम खेळात नावलौकिक कमावले. दिल्ली, मद्रास येथिल राष्ट्रिय स्पर्धांमध्ये भाग घेऊन मेघना यांनी विजय मिळवला. मात्र काकांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुर्दैवाने मेघना यांचे अकाली निधन झाले.
केदारी काका यांना उत्कृष्ट खेळाबद्दल अनेक नामांकित व्यक्तिंनी सन्मानित केले आहे. मुंबई येथे 1989 मध्ये तत्कालिन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदक मिळाले. 1986 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनही गौरव करण्यात आला. तसेच 1986 मध्येच पुणे शहराचे तत्कालिन महापौर उल्हास ढोले पाटील यांच्याकडूनही पुणे महानगरपालिकेच्या वतीने काकांचा गौरव केला. यासह विविध नामांकित व्यक्तींनी काकांच्या खेळाचे कौतुक करत त्यांना सन्मानित केले आहे. काका सांगतात, कॅरम खेळासाठी सराव हा खुप महत्वाचा आहे. तसेच या खेळासाठी एकाग्रताही खुप महत्वाची आहे. त्यासाठी सकाळी प्राणायाम करणे गरजेचे आहे. दरम्यान, कॅरम खेळण्याची इच्छा असलेल्या अंध व्यक्तींसाठी त्यांना इलेक्ट्राॅनिक कॅरम बनविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.