नवी दिल्ली – ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नागरी हवाई वाहतुक महासंचलनालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर स्थगित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबर पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय 1 डिसेंबर रोजी होणार होता. मात्र ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल, असे जाहीर केल्याच्या एक आठवड्याच्या आतच त्याला स्थगिती देण्यात आली होती.
भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जेनेवारी 2022 पर्यंत स्थगित राहतील, असे “डीजीसीए’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारताची आंतरराष्ट्रीय विमानसेवा करोनाच्या साथीमुळे 23 मार्च 2020 पासून स्थगित करण्यात आली होती. मात्र मे 2020 पासून वंदे भारत अभियानांतर्गत काही देशांमधील विमानसेवा सुरू ठेवण्यात आली होती. तर निवडक देशांपुरती एअर बबल अंतर्गत जुलै 2020 पासून दुहेरी विमानसेवाही सुरू करण्यात आली होती.