पुणे – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वीची मुदत गुरुवारी (दि.9 डिसेंबर) संपत होती. ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणारे आदी सर्वांना लागू राहील.
अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानुसार विलंब शुल्कासह 21 ते 28 डिसेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. यानंतर 2 जानेवारीपर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बॅंकेत शुल्क भरू शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत दि. 4 जानेवारी आहे.