इस्लामाबाद – अमेरिका आणि चीनमध्ये शीतयुद्धाची मानसिकता निर्माण होण्याची शक्यता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेटाळून लावली आहे. अशी शक्यता असल्यास दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला कोणत्याही एका गटात सहभागी व्हायचे नाही. त्याऐवजी पाकिस्तानला दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करायला आवडेल, असे ते म्हणाले.
“इस्लामाबाद-कॉन्क्लेव्ह 2021′ मध्ये “शांततामय आणि समृद्ध दक्षिण आशिया’ या विषयावर बोलताना इम्रान खान यांनी ही मध्यस्थीची तयारी दर्शवली. अमेरिका आणि चीनदरम्यानच्या संभाव्य शीतयुद्धाबरोबरच प्रादेशिक शांततेबद्दलही इम्रान खान यांनी आपली मते मांडली. जगात नव्याने शीतयुद्ध निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या शीतयुध्दासाठीचे दोन गट निर्माण होण्यापासून वाचवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. या गटांपैकी एका गटात सहभागी देखील पाकिस्तानला व्हायचे नाही. जगातील दोन महासत्तांमधील सत्ता स्पर्धेंचा जगाला आणि पाकिस्तानलाही पूर्वी मोठा फटका बसला आहे, असे इम्रान खान म्हणाले.
पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि इराणमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही देशांमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली होती. पण तो टाळला गेला आहे. चीन आणि अमेरिकेबरोबर पाकिस्तानचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान नक्की करेल, असे ते म्हणाले.