पुणे – महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलने सर्वाधिक पदके मिळवीत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलच्या अॅथलेटिक्स ट्रॅकवर या स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे हे १२ वे वर्ष असून यावर्षी ५२ शाळांतील ८५० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेअंतर्गत ८ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी ५० मी. धावणे, लांब उडी, ५०x४ रिले तसेच १० वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी ८० मी. धावणे, लांब उडी, ५०x४ रिले तसेच १२ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी १०० मी. धावणे, लांब उडी, ८०x४ रिले या क्रीडाप्रकारांचा समावेश होता.
कॉसमॉस बँक यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. कॉसमॉस बँकेचे संचालक अजित गिजरे यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले, महाराष्ट्रीय मंडळ शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले, मुख्याध्यापिका निधि सामंत, आदिती सहत्रबुद्धे, अंजली जोशी, रुची धाकेफाळकर उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आगाशे कॉलेजच्या मैदानावर संपन्न झाला. स्पर्धेच्या संयोजनासाठी महाराष्ट्रीय मंडळच्या सर्व क्रीडा शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे सूत्रसंचालन अमित डांगे व तेजस देसुरकर यांनी केले तर सचिन परदेशी यांनी आभार मानले.