नवी दिल्ली – महिनाभरात पोलीस ठाण्यांत आणि इतर तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. सर्वोच्च न्यायालयासमोर याआधी कोठडीतील छळाशी संबंधित प्रकरण सुनावणीसाठी आले होते. त्यावरून न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये पोलीस ठाण्यांत आणि तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश जारी केला होता.
त्यावेळी कॅमेरे बसवण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली. संबंधित आदेशाच्या पालनाशी निगडीत अहवाल 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सादर केले नसल्याची माहिती सोमवारी न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आधीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली.
तसेच, केंद्र आणि राज्य सरकारांना 29 मार्चपर्यंत आदेश पालनाशी संबंधित प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास सांगितले. नव्या आदेशाचे पालन न झाल्यास केंद्रीय गृह सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि गृह सचिव यांच्या विरोधात आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश सीबीआय, ईडी आणि एनआयएसाठीही लागू आहे.