टाकळी ढोकेश्वर -प्राथमिक शिक्षक बॅंकेने सभासदांना भेट म्हणून देण्यासाठी खरेदी केलेल्या घड्याळाच्या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पारनेर तालुका सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष संतोष खामकर यांनी केली आहे.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना दिलेल्या निवेदनात खामकर यांनी म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षक बॅंकेने शताब्दी महोत्सव सोहळ्यासाठी सुमारे 96 लाख रुपये तरतूद केली होती. परंतु त्यातील 60 ते 65 लाखांची रक्कम गुरुमाऊली प्रणित संचालक व अध्यक्षांनी सभासदांना घड्याळ भेट घ्यावे, म्हणून खर्च केलेली आहे.
त्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप सत्तेत सहभागी असणाऱ्या गुरुमाऊलीच्या दुसऱ्या गटाने केला आहे. त्यामुळे बॅंकेच्या सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबद्दल नाराजी पसरली आहे. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खामकर यांनी निवेदनात केली आहे.
बॅंकेचा कारभार पारदर्शी ः अनाप
प्राथमिक शिक्षक बॅंकने सभासदांचे हित जपले असून, पारदर्शी कारभार चालला असल्याने विरोधक बॅंकेची बदनामी करत आहेत. घड्याळ खरेदीमध्ये कुठलाही दलाल वा मधस्ती न घालता बॅंकने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत. त्यामुळे कुठल्याही चौकशीला तयार आहोत, असे प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप यांनी सांगितले.