पुणे- मुलीच्या अपहरण प्रकरणात 1993 पासून तब्बल 27 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मुंबईच्या कांदीवली परिसरातून अटक केली.
रामजी सेवालाल कनोजिया उर्फ धोबी (वय.50,रा. किशकिंदानगर झोपडपट्टी कोथरुड. मुळ. उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपासासाठी त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने देखील त्याला फरारी घोषीत केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्ये धोबीने कोथरुड परिसरातून एका मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी त्याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून तो मिळून येत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.
दरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी धनंजय ताजणे व मॅगी जाधव यांना धोबी हा ओम साईनाथ चाळ कांदीवली वेस्ट मुंबई येथील परिसरात राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून धोबीला ताब्यात घेतले. तो मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, सहायक फौजदार शाहीद शेख, कर्मचारी राहुल निगडे, गणेश पाटोळे यांच्या पथकाने केली.