मुंबई : पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी भाजपच्या एका बड्या नेत्याची धडपड सुरू आली होती. ही धडपड करणारे दुसरे कोणी नसून भाजप आमदार राम कदम होते हेही स्पष्ट झाले. कदम यांनी आरोपींच्या सुटकेसाठी पोलिसांनाच फोन केल्याचे उघड झाले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?,” असं म्हणता रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला. ट्वीट करून रोहित पवार यांनी कदम यांना टोला लगावला.
मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2021
मुंबईतील पवई पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अमानुष मारहाण केली होती. दिपू तिवारी, सचिन तिवारी आणि आयुषा राजभर अशी आरोपींची नावं आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली होती. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली होती.