नवी दिल्ली : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. दरम्यान, होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.