लंडन – गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था डगमगली असून आता ब्रिटनला महागाईचा तडाखा बसू लागला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये दुधासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले असून सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. ब्रिटनच्या अधिकृत सांख्यिकी संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे गेल्या काही कालावधीमध्ये दुधाच्या दरात तब्बल 45 टक्के वाढ झाली आहे.
साखरेचे दर 42% ने वाढले आहेत याशिवाय दुधाशी संबंधित असलेले पनीर दही आणि लोणी हे जीवनावश्यक पदार्थही 30 ते 35 टक्के महाग मिळू लागले आहेत. ब्रिटनच्या नागरिकांच्या न्याहारीचा भाग असणाऱ्या अंड्यांचे दरही 28 टक्क्याने वाढले आहेत.
दुसरीकडे ब्रिटन मधील नागरिकांच्या सरासरी वेतन पातळीमध्ये सुद्धा अडीच टक्के घट झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच एकीकडे नागरिकांचे उत्पन्न कमी होत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत चालली आहे. गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत चालली आहे.
अनेक सरकारी आणि खाजगी संघटनांमध्ये कामगारांनी वेतन वाढीसाठी आंदोलनही सुरू केली आहेत साधारणपणे दरवर्षी कामगारांना जेवढी वेतन वाढ दिली जाते, त्याच्यापेक्षा खूपच कमी वाढ गेल्या बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये देण्यात आली असल्याने कामगार जगातही असंतोष आहे. नजीकच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल आणि महागाईवर नियंत्रण येईल अशी आशा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.