बाळाच्या सर्वागीण विकासासाठी पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक आहे. ब-याचदा रात्र-रात्र बाळ झोपत नाही. सुरुवातीच्या काही महिने अशा तक्रारी सामान्यपणे दिसू शकताता, मात्र बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतरही अशा प्रकारच्या तक्रारी येत असतील, तर आपल्या बाळाच्या झोपेचे योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.
बाळाची झोपेची समस्या केवळ बाळालाच नाही, तर पालकांनाही त्रासदायक ठरू शकते. बाळासोबत पालकांनाही थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप न झाल्याने बाळ चिडचिडे, उदास, अस्वस्थ होऊ शकते. बाळाची चिडचिड होऊ नये म्हणून तसेच बाळाला निरोगी आणि आजारपणांपासून दूर ठेवण्यासाठी बाळाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे.
बाळाचे शरीर अजूनही विकसित होत असल्याने बाळाला पुरेशी झोप आणि आराम मिळाल्यास बाळाच्या शरीराचे कार्य उत्तमरीत्या सुरू राहते. प्रतिकार प्रणालीच्या आणि मेंदूच्या विकासासाठी बाळाला पोटभर अन्न आणि चांगली झोप मिळणे आवश्यक असते.
झोपेचे वेळापत्रक तयार करा
आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच बाळासाठी तुम्ही झोपेचे चांगले रुटीन वेळापत्रक तयार करा. आपल्याला हे जाणून आश्चर्यही वाटेल, पण आपल्या बाळाला उशिरा झोपण्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो हे तितकेच खरे आहे.
बाळाला पुरेशी झोप मिळतेय का हे तपासा
झोपेची आवश्यकता वयानुसार बदलू शकते. म्हणूनच, डॉक्टरांशी बोलणे आणि आपल्या बाळाला किती झोपेची आवश्यकता असू शकते हे जाणून घेणे चांगले ठरेल. बाळांना रात्र आणि दिवस ह्यामधील फरक कळू द्या. फक्त बाळाला रात्र झाल्यावर झोपायचे असते आणि दिवसा खेळायचे आणि दूध प्यायचे असते हे समजले पाहिजे. तुम्ही बाळाचे झोपेचे वेळापत्रक करू शकता.
आजूबाजूचा परिसर शांत ठेवा
बाळाच्या झोपेची जागा शांत असावी जेणेकरून आवाजामुळे झोपेत अडथळा येणार नाही. बाळ झोपले असताना बाळाच्या खोलीत तीव्र प्रकाश येता कामा नये, याची काळजी घ्यावी. झोपेची जागा स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता वेळोवेळी बेडशीट्स बदलणे, बाळाचा बिछाना स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. बाळाला शांत झोप लागावी याकरिता बाळाच्या अंगावर सुती कपडय़ांचा वापर करावा.