बार्बाडोस :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी येथे दाखल झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी कसून सराव सुरू केला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव दिवसातील दोन सत्रांमध्ये सुरू आहे.
येत्या 12 जुलैपासून या दोन संघातील पहिल्या कसोटीला प्रारंभ होत असून त्यापूर्वी येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खेळाडू बीचवर हॉलिबॉलही खेळत आहेत. त्याचाच एक व्हीडीओ बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर पोस्ट केला आहे.
विराट कोहली, इशान किशन व राहुल द्रविड यांच्यासह श्रीकर भरत, अक्सर पटेल, महंमद सिराज, अजिंक्य रहाणे या खेळाडूंनी दोन्ही सत्रात फलंदाजीचा सराव करण्यावर भर दिला आहे.
दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मासह अन्य काही खेळाडू सुट्टीचा आनंद लुटल्यावर बुधवारी बार्बाडोसला दाखल झाले आहेत.
भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी इतिहासाबाबत सांगायचे तर 2002 सालापासून वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यानंतरच्या 8 कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. सध्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वासही खालावला आहे.
झिम्बाब्वेत सुरू असलेल्या विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतही वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागल्याने ते यंदाच्या विश्वकरंडकासाठी पात्र ठरलेले नाहीत. अशा स्थितीत या मालिकेतही भारतीय संघाचेच पारडे जड राहणार आहे.
भारतीय संघाच्या सराव शिबिरात रोहित व कोहलीने उसळत्या चेंडूंवर जास्त सराव केला. या दोघांनाही गेल्या काही सामन्यांमध्ये रिव्हर्स स्विंगनेही खूप सतावले आहे. त्यामुळे सरावात या दोघांनीही अशा चेंडूंवर फलंदाजी करण्यावर भर दिला.
वेस्ट इंडीजमधील खेळपट्टीचा अनुभव असलेले रोहित व कोहली यांनी संघातील नवोदितांनाही बहुमोल टीप्स दिल्या. या वेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पंच उभे राहतात तसे उभे राहून प्रत्येक फलंदाजाच्या सरावाचे निरीक्षणही केले व खेळाडूंना महत्वाच्या सूचनाही केल्या.
खेळाडूंनी घेतली सोबर्स यांची भेट..
वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांची भारतीय संघातील खेळाडूंनी भेट घेतली. त्यात कर्मधार रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही सोबर्स यांनी खूप गप्पा मारल्या. विशेषतः कोहली व गिलचे खास कौतुक केले. यावेळी सोबर्स यांची पत्नीही उपस्थित होती.
भारत कसोटी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), श्रीकर भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, महंमद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.