नवी दिल्ली – औद्योगिक उत्पादन वेगाने वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. खासगी कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी केंद्र सरकार आग्रह करत आहे. मात्र तरीही मागणी नसल्यामुळे या क्षेत्राची उत्पादकता पुरेशा प्रमाणात वाढत नसल्याची आकडेवारी समोर आली आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 मध्ये औद्योगिक उत्पादन केवळ 3.8 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 5.1 टक्क्यानी वाढले होते. केंद्र सरकारला जर विकास दर सात टक्क्यापेक्षा जास्त करायचा असेल तर औद्योगिक उत्पादन शक्य तितक्या लवकर वाढण्याची गरज असल्याचे मत विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये खान क्षेत्राची उत्पादकता 5.1 टक्क्यांनी वाढली आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 3.9 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन 6.1 टक्क्याने वाढले आहे.
जर भारताला चालू आर्थिक वर्षात विकासदर सात टक्के ठेवायचा असेल तर औद्योगिक उत्पादन आणखी वाढण्याची गरज आहे. जानेवारी ते मार्च यादरम्यान औद्योगिक उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र मागणी कमी आहे त्याचबरोबर व्याजदर जास्त आहेत. अशा परिस्थितीत महाग भांडवल घेऊन मागणी नसताना उत्पादन वाढविण्यास खासगी कंपन्या उत्सुक नाहीत असे वातावरण आहे.
केंद्र सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रात गेल्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे विकासदर वाढीला चालना मिळत आहे. मात्र एवढे पुरेसे नाही. यासाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने खासगी क्षेत्राला अनेक वेळा उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केले आहे. मात्र देशांतर्गत मागणी कमी असतानाच परदेशातून मिळणार्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्र उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेत नसल्याचे वातावरण आहे.