पिंपरी – महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी अशा हेतूने सुरू करण्यात आलेला बहुप्रतिक्षीत इंद्रायणी थडी- 2023′ महोत्सवाचा जोरदार शुभारंभ बुधवारी (दि.25) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर दि. 25 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान “इंद्रायणी थडी-2023′ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या शुभारंभासाठी फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षा अन् पार्किंगची व्यवस्था
तब्बल 17 एकर जागेत भरवण्यात आलेला हा भव्य महोत्सव नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हजारपेक्षा अधिक स्टॉल, 800 पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सहभाग, ग्राम संस्कृती, बारा बलुतेदार व्यवस्था, 500 पेक्षा अधिक स्टॉलमध्ये खाद्यमहोत्सव, मोफत बालजत्रा, भजन महोत्सव आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 25 पेक्षा अधिक स्पर्धांद्वारे सुमारे हजार नागरिकांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग ही जत्रा यावर्षीसुद्धा गर्दीचे “रेकॉर्डब्रेक’ करणार आहे. तसेच, 90 पेक्षा अधिक सीसीटीव्ही द्वारे 24 तास देखरेख, सुरक्षेसाठी 120 पोलीस अधिकारी, 22 वाहतूक पोलीस तैनात आणि 300 पेक्षा अधिक स्वयंसेवक तत्पर मदतीसाठी असतील.
“सन्मान नारीशक्तीचाअभिमान भारतीय संस्कृतीचा..’ हे ब्रीद घेवून सुरू केलेला हा “इंद्रायणी थडी’ महोत्सव गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे झाला नाही. यावर्षी नव्या उत्साहाने आम्ही तयारी केली आहे. महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या कुटुंबासह नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि सहभागी महिला बचतगटांना प्रोत्साहन द्यावे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड.