पिंपळे गुरव – सांगवीतील मयुरी देशमुखने भारतातील पहिली महिला ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन म्हणून मान मिळविला आहे. तिने आकाशात घेतलेल्या गगनभरारीने तरुणींना प्रेरणा मिळत आहे. नुकताच तिचा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.ऑफशोअर म्हणजे फक्त किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात वसलेले जसे की मुंबई हाय, भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र, देशात फक्त एक महिला पायलट ऑफशोअर फ्लाइट चालवते ती म्हणजे कॅप्टन “मयुरी देशमुख’ तिच्या वडिलांपासून प्रेरणा घेत ती या क्षेत्रात गगनभरारी घेत आहे. तिच्या कुटुंबात तिच्यासह वडील, तिची धाकटी बहीण असे तिघेजण पायलट आहेत. एकाच कुटुंबातील तिघेही पायलट क्षेत्रात कार्यरत असल्याचे चित्र क्वचितच पहावयास मिळते.
वडील विश्वासराव देशमुख हे एअर फोर्समध्ये हेलिकॉप्टर पायलट होते. ते 2003 मध्ये सेवानिवृत्त झाले. धाकटी बहीण राधिका देशमुख ही एअरलाइन्समध्ये पायलट कॅप्टन आहे. जुनी सांगवीतील शितोळे परिवार हे मयुरीचे आजोळ असून, मयुरी सध्या औंध येथील रक्षक सोसायटी येथे वास्तव्यास आहे. या यशाबद्दल सांगवीकरांमधून तिचे कौतुक होत आहे. सांगवीतील आकाशाला गवसणी घालणारी मयुरीने सर्वांची मान उंची केली आहे. 2015 मध्ये सरकारी पवन हंस लिमिटेडमध्ये सामील होण्यापूर्वी कॉर्पोरेट फ्लाईंग चालविण्याचा दोन खासगी हेलिकॅप्टर कंपन्यांमध्ये तिने काम केले आहे. एक वर्षभर ईशान्येकडील टेकड्यापासून अंदमान निकोबार बेटांवर भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारतीय भूगोल ओलांडून किनाऱ्यावर उड्डाण केले आहे. प्रवाशांना विमान तळावरून दुर्गम भागात घेण्याचाही अनुभव तिने घेतला आहे.
भारतातील पहिली महिला
भारतातील पहिली महिला कॅप्टन म्हणून काम करण्याचा तिला मान मिळाला आहे. याबद्दल नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला. दररोज शेकडो विमाने आपण आकाशात पाहात असतो. पण यामध्ये एक आपल्या सांगवीतील महिला आहे हे पाहून आपल्याला अभिमान आहे. संपूर्ण भारतात 2700 महिला वैमानिक आहेत.