नवी दिल्ली :- देशाचे महान व ज्येष्ठ कुस्तीपटू कर्तार सिंग यंदाच्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. उपाध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या पाच उमेदवारांमध्ये त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
महासंघाची निवडणुक येत्या रविवारी होत असून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेती खेळाडू अनिता श्योराण यांची थेट लढत महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मर्जीतल्या संजय सिंह यांच्याशी होणार आहे. संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनिता श्योराण महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंच्या बाजूने ब्रिजभूषण यांच्या विरोधात उभ्या होत्या.
कर्तारसिंग यांच्यासह असित कुमार साहा (बंगाल), जय प्रकाश (दिल्ली), मोहन यादव (मध्य प्रदेश) आणि एन फोनी (मणिपूर) हे उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या निवडणुकीत अनिता श्योराण या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांना क्रीडा मंत्रालयाचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. अनिता पोलिस दलात कार्यरत आहेत.
ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत. ब्रिजभूषण यांचे कुटुंबीय ही निवडणूक लढवत नसले तरीही आपल्याच मर्जीतील अनेक सदस्यांना त्यांनी या निवडणुकीत उभे केले आहे.
हरियाणाच्या व्यक्तीला ब्रिजभूषण यांचा विरोध…
हरयणातील कोणत्याही सदस्याला यानिवडणुकीत यश मिळू नये यासाठी ब्रिजभूषण यांनी जय्यत तयारी केल्याचे सांगितले जात आहे. हरियाणातील व्यक्तीच्या विरोधात ते पहिल्यापासूनच कार्यरत होते. देवेंद्रसिंग कादियान, अनिता आणि प्रेमचंद लोचब यांच्या नावांवर त्यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांतही विरोध केला होता.