लंडन- “ब्रेक्झिट’च्या मुद्दयावरून ब्रिटनची संसदच स्थगित करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाविरोधात मूळ भारतीय वंशाच्या एका महिलेने कायदेशीर लढा उभारला आहे. गीना मिलर असे या महिलेचे नाव आहे. संसदेची मंजूरी न घेताच “ब्रेक्झिट’च्या मसुद्याला परवानगी देण्याबाबत माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी सुरू केलेल्या हालचालींनाही गीना मिलर यांनी मोठा विरोध केला होता. त्यांनी केलेल्या विरोधाच्या जनआंदोलनामुळेच थेरेसा मे यांना “ब्रेक्झिट’रेटण्याचा आपला मार्ग सोडून द्यावा लागला होता.
आता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदच स्थगित करण्याची जी शिफारस महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे केली आहे, त्याविरोधातही गीना मिलर यांनी कायदेशीर लढा देण्यास कंबर कसली आहे. मिलर यांनी पंतप्रधान जॉन्सन यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तात्काळ सुनावणीची याचिका मिलर यांनी न्यायालयात दाखल केली आहे.
ब्रिटनची संसद 9 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्यात येईल, अशी घोषणा करणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भ्याड आहेत, अशी खरमरीत टीका मिलर यांनी केली आहे. 31 ऑक्टोबर ही “ब्रेक्झिट’ची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वी याविषयीचा निर्णय होणे अत्यावश्यक आहे. मात्र जॉन्सन यांच्या या निर्णयामुळे “ब्रेक्झिट’च्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी खासदारांना अत्यल्प कालावधी मिळणार आहे. मिलर यांनी तात्काळ सुनावणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला समर्थन देण्यासाठी संपूर्ण ब्रिटनमधून “ऑनलाईन’ पाठिंबा मिळायला सुरुवात झाली असून आतापर्यंत लक्षावधी लोकांनी या याचिकेला आपले समर्थन असल्याचे मत नोंदवले आहे.
गीना मिलर या व्यवसायाने गुंतवणूक व्यवस्थापिका आहेत. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या गीना यांचे पूर्ण नाव गीना नादिरा सिंह असे असून पूर्वीच्या ब्रिटीश गिनिया (आताचे गयाना) मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या गयानाच्या माजी ऍटर्नी जनरल दूदनाथ सिंह यांच्या कन्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीतही मिलर यांनी कडाडून विरोध केला होता.