केपटाऊन – भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकेसाठी कसून सराव करत आहे.
या मालिकेसाठी अनुभवी शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादवसह एकूण 8 खेळाडू दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले आहेत. तसेच त्यांनी सरावासही सुरुवात केली आहे. यासंदर्भात धवनने सोशल मीडियावर पोस्ट टाकत माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सर्व भारतीय खेळाडू पोहोचल्यानंतर केपटाऊनमध्ये 3 दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईन कालावधीतून गेले आहेत. या सर्वांचा शुक्रवारी (14 जानेवारी) सकाळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर त्यांनी न्यूलॅंड्स येथील नेट्समध्ये सरावास सुरुवात केली आहे.
याप्रसंगी शिखर धवन नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. धवनबरोबरच भुवनेश्वर, सूर्यकुमार, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, वेंकटेश अय्यर आणि युझवेंद्र चहल हेदेखील नेट्समध्ये घाम गाळत आहेत.