मुंबई – मराठमोळी, मुंबईकर सोनल काळेने “मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब आपल्या नावावर केला आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
“नमस्कार… मी सोनल काळे… बॉलिवूडची कोरिओग्राफर असण्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुअंसरदेखील आहे. कंटेट क्रिएट करण्याची मला आवड आहे. मी जन्माने भारतीय आहे. मनाने महाराष्ट्रीअन आहे तर राहायला परदेशात आहे. मी गुजराती व्यक्तीसोबत लग्न केले आहे. मला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा अभिमान आहे. एक नवीन संस्कृती आत्मसात करायला मला आवडते. मिळालेल्या संधीचे मी सोनं केले आहे. आता माझ्या स्वप्नांना मी सत्यात उतरवले आहे,’ असे सोनलने लिहिले आहे.
सोनलचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथील एका गुजराती व्यक्तीसोबत लग्न केले. आता तिचे आई-वडील मुंबईत राहत असून त्यांना आपल्या लेकीचा अभिमान आहे.
सोनल ही एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे. सोनल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. “चायवाली लडकी’ म्हणून ती लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.