पुणे – आत्महत्या करत असल्याचा संदेश व्हॉट्सअपवर पाठवून खडकवासला धरणामध्ये तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यासंदर्भात आकस्मिक मृत्यू अशी नोंद पोलिसांनी केली आहे.
अनिकेत सुनील आल्हाट (21, रा. नऱ्हे) हे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी खडकावसला धरणाच्या पंप हाऊसजवळ सापडला. अनिकेत गुरुवारपासून (25 ) बेपत्ता होता. तो घरात काही न सांगता निघून गेला होता. आपण आत्महत्या करत असून त्यास कुणालाही जबाबदार धरू नये, या आशयाची चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्वी लिहिली होती. ती त्याने एका मित्राला व्हॉट्स अपवर पाठवली होती. त्याच्या मित्राने ही बाब त्याच्या नातेवाइकांना सांगितली. अनिकेतने मोबाईल बंद असल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याच्या नातलगांनी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांना खडकवासला धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हवेली पोलिस ठाण्याचे पथक तेथे रवाना झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्याच्या खिशात मोबाईल आढळला. त्यातील सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना फोन केला. त्यानंतर या संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला. अनिकेतच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.