World’s 4th largest stock market : भारताचा शेअर बाजार जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकत भारताने हे स्थान मिळवले आहे. भारतीय शेअर बाजाराने प्रथमच हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकले आहे. भारतासाठी मजबूत वाढीचा अंदाज आणि धोरणात्मक सुधारणांमुळे येथील शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी आकर्षक आहे.
सोमवारी संध्याकाळी बाजार बंद होताना, हाँगकाँग एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केलेल्या समभागांचे एकूण मूल्य $4.29 ट्रिलियन होते. तर भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केलेल्या समभागांचे एकूण मूल्य $ 4.33 ट्रिलियन होते. भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने 5 डिसेंबर रोजी प्रथमच $4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला. दरम्यान, या मार्केट कॅपपैकी निम्मी रक्कम गेल्या 4 वर्षांत आली आहे.
भारतीय शेअर बाजारात झपाट्याने वाढ –
भारतात शेअर बाजार सातत्याने वाढत आहे. अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांची झपाट्याने वाढ आणि मजबूत कॉर्पोरेट कमाई यामुळे हे घडले आहे. भारत जगातील मोठ्या कंपन्यांचा फेव्हरेट राहिला आहे. स्थिर सरकार आणि धोरणात्मक सुधारणांमुळे, अलीकडच्या काळात भारतातील उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, भारत ही जगातील प्रमुख देशांपैकी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.