मुंबई – रुपया घसरत असलेल्या भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरत नसल्यामुळे या गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा चालूच आहे. फेब्रुवारी या गुंतवणूकदारांनी तब्बल 5,517 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
अमेरिकेने अगोदरच पाव टक्के व्याज दर वाढ केली आहे. त्याचबरोबर पुढील एक वर्षामध्ये अमेरिका किमान एक ते दीड टक्के व्याज दरात वाढ करणार आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अमेरिकेमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवणचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत डॉलर वधारत असतानाच भारतीय रुपया मात्र वेगाने घसरत आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणुकीवर परदेशी गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळणार आहेत.
त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण चालूच असून सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 364 अंकांनी कमी होऊन 54,470 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 109 अंकांनी म्हणजे 0. 67 टक्क्यांनी कोसळून 16,301 अंकावर वर बंद झाला.
भारतातील सर्वात मोठे कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर घसरल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला नाही. नेस्ले, इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. पावर ग्रिड, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र शेअर बाजारात एकूणच वातावरण कमालीचे नकारात्मक होते. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील बहुतांश देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांनी विक्री करणे पसंत केले.