आयपीएल स्पर्धा यंदाच्या मोसमात आश्चर्यकारक निकाल देणारी ठरत आहे. त्याहीपेक्षा नवल या गोष्टीचे वाटते की, जे खेळाडू आयपीएल गाजवत होते, तेच आज धावांसाठी झगडताना दिसत आहेत. महेंद्रसिंह धोनी, लोकेश राहुल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक आग्रवाल या भारतीय खेळाडूंसह अनेक स्टार परदेशी खेळाडू अपयशाच्या गर्तेत आडकल्याचे या स्पर्धेत दिसले. त्यामुळे नाव मोठे व लक्षण खोटे असेच चित्र दिसत आहे.
यंदाच्या मोसमात उलटफेर होताना दिसत आहेत. पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ असो किंवा चार वेळा स्पर्धा विजेता धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ असो सलग पराभवांनीच बेजार झाले आहेत. मुंबईने तर सलग आठ सामने गमावल्यावर एक विजय मिळवला. या संपूर्ण स्पर्धेत धोनी, कोहली, राहुल, धवन, मयंक यांनी एखाद्या सामन्यात चांगली खेळी केली. मात्र, सातत्य कुठेच दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. परदेशी खेळाडूंमध्येही सुनील नरेन, मार्कस स्टोनिस, ट्रेन्ट बोल्ट, टीम साउदी यांच्यासह अनेक खेळाडूही अपयशी होताना दिसले. या उलट स्पर्धेतील देशी व परदेशी युवा खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा जास्त सरस कामगिरी केली आहे.
उमरान मलिक, कुलदीप सेन, टी. नटराजन, आवेश खान, मोहसीन खान, रिंकू सिंग, डॅनियल सॅम्स, दुष्मंत चमिरा हे सातत्याने सरस कामगिरी करत आहेत. मुंबईच्या इशान किशनवर तर सध्या प्रचंड टीकाही होत आहे. तो तब्बल 15 कोटींचा करार मिळवत यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र, कामगिरी पाहिली तर एखाद्या क्लब दर्जाच्या फलंदाजाइतकीही त्याची कामगिरी नाही.
पृश्वी शॉने काही सामन्यांत चांगली खेळी केली. मात्र, आपल्या क्रिकेटची हिच शोकांतिका आहे की आपल्या खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यांतच अपयश येते व त्यामुळे ते मोठी मजल मारू शकत नाहीत. अफाट गुणवत्ता असूनही ते मोठ्या स्तरावर यशस्वी होत नाही व आयपीएल ते आयपीएल एव्हढेच क्रिकेट खेळताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजू सॅमसन. कोहलीला देखील या स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकच अर्धशतकी खेळी करता आली, ती रोहितला मात्र एकाही सामन्यात जमली नाही.
प्रमुख भारतीय खेळाडूंची कामगिरी यंदाच्या स्पर्धेत अत्यंत सुमार झाली. याला कारण भारतीय संघ खेळत असलेले अति क्रिकेटच आहे यात शंका नाही. सतत खेळत असल्यामुळे या खेळाडूंच्या देहबोलीतही कंटाळा स्पष्ट दिसत आहे. केवळ मोठ्या रकमेचा मोह सोडवत नाही म्हणूनच हे मनात नसतानाही या स्पर्धेत खेळत आहेत. केवळ सततचे सामनेच नव्हे तर गेल्या कित्येक काळापासून या खेळाडूंना बायोबबलमध्येही राहावे लागत असल्यामुळेही त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे नाकारता येणार नाही. आता उर्वरित सामन्यांत ते काय दिवे लावणार हे समजेलच, पण सध्या तरी त्यांची कामगिरी नाव मोठे लक्षण खोटे अशीच आहे.