संगमनेर – शहरातील कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे करत असल्याची खबर पोलिसांना लागताच एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. तीन ठिकाणी अश्लिल कृत्य सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 29 मुला-मुलींना ताब्यात घेतले, त्यात 13 मुलींचा समावेश आहे. अशा कृत्यांसाठी व्यवस्था करून देणाऱ्या तिघा कॉफी चालकांवर मुंबई पोलीस अधिनियमातील कलम 129 अन्वये कारवाई करण्यात आली.
शाळा, महाविद्यालयाच्या रस्त्यावरच काहीशा आडवाटेला थाटलेल्या अशा ठिकाणांवर खरेतर चहा-कॉफी अथवा स्नॅक्ससारख्या गोष्टी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ही ठिकाणं पाहिली तरी सहज संशय यावा अशा पद्धतीने ती तयार करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या जोडप्यांना’ चहा-कॉफी नव्हेतर आतमध्ये निवांतपणा मिळावा यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. तेथे वेळ घालवण्यासाठी एकदा का काऊंटरवर तासानिहाय अपेक्षित वेळेचे पैसे दिले की तितका वेळ संपेपर्यंत त्या जोडप्याकडे कोणीही फिरकत नाही. ही ठिकाणं म्हणजे अश्लिल चाळे करण्याचे उत्तम साधन ठरु लागल्याने शहरात त्यांची संख्याही वाढली आहे.
सकाळी संगमनेरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. या प्रकारांना पायबंद घालण्याची विनंती केली. यावेळी बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने शहरातील काही कॉफी शॉपमध्ये घडलेल्या अशा प्रकार त्यांच्यासमोर ठेवले. हा सर्व प्रकार ऐकून त्यांनीही तत्काळ कारवाई करण्याची तयारी दाखवतांना पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने कारवाईसाठी रवाना केले.
या कारवाईत गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटी नजीकच्या अक्षय विक्रम घुले याच्या वेटलॉस कॅफे, अकोले बायपास रस्त्यावरील मयुर विनायक जाधव याचे टाईम आऊट कॅफे व याच परिसरातील अक्षय बाजीराव जाधव याच्या क्राऊन कॅफे या ठिकाणांमध्ये अश्लिल कृत्य करीत असतांना 13 जोडप्यांसह एकूण 29 जण आढळून आले. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तसेच असे गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या वरील तिघाही कॅफे चालकांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी छापा घालून पकडलेल्या 29 मुला-मुलींना पुन्हा अशा ठिकाणांवर जावून असे कृत्य करणार नसल्याची हमी घेण्यात आली. त्यांना समज देवून सोडण्यात आले. कॉफी शॉपच्या नावाने मनोरंजनाच्या ठिकाणांचा अशाप्रकारच्या कृत्यांसाठी वापर केल्याप्रकरणी त्या तिघांवरही मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 129 नुसार कारवाई करण्यात आली आहे.