लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकार आता इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करण्यासाठी हालचाल करत असल्याचे म्हटले जात आहे. इम्रान खान पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात आता देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी पाकिस्तान सरकारकडून सुरु आहे. यासाठी सरकारने एक समितीही स्थापन केली असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तान सरकारने शुक्रवारी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती इम्रान खान यांच्याविरोधात देशद्रोहाच्या कार्रवाईसंदर्भातील निर्णय घेईल. मंत्री मरियम औरंगजेब यांनी माध्यमांना माहिती देत सांगितलं आहे की, मंत्रिमंडळाने इम्रान खान यांच्याविरोधात देशद्रोहाच्या कारवाईसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पीटीआय देशद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आहे की नाही यासंदर्भात निर्णय घेईल.
पाकिस्तानी संविधानानुसार, कलम 6 अंतर्गत जर कोणत्याही व्यक्तीने राज्यघटना किंवा संविधान मोडले, बळजबरीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने राज्यघटना मोडण्याचं षडयंत्र केलं, तर अशी व्यक्ती देशद्रोही असून त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होते.
माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, ही समिती कायदा मंत्री आझम नजीर तरार यांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सूचना मांडेल. मागील सरकारने असंवैधानिक आदेश दिले होते असे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.