आयसीएमआरच्या अभ्यासातील भीषण वास्तव; चिंता वाढली
नवी दिल्ली : श्वसनाचे तीव्र विकार असलेल्यांमध्ये करोनाची लागण वाढत आहेत, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) अलीकडेच केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. त्याचवेळी या पैकी 40 टक्के लोकांच्या संसर्गाचा स्रोत समजत नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
आयसीएमआरने करोनाच्या चिंता वाढवणाऱ्या तपशीलाकडे याद्वारे लक्ष वेधले आहे. हा अहवाल शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला. श्वसनाचे तीव्र विकार असणाऱ्या लोकांमध्ये गेल्या महिन्याभरात करोना बाधितांची संख्या वाढत आहे.
आयसीएमआरने 15 फेब्रुवारी ते दोन एप्रिल या काळात श्वसनाचे तीव्र विकार असणाऱ्या (सारी) पाच हजार 911 जणांची तपासणी केली. त्यात 104 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. हे प्रमाण 1.8 टक्के आहे. 20 राज्य आणि 52 जिल्यातील हे बाधित आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
सारी बाधितांमध्ये करोना बाधितांचे प्रमाण मार्चच्या मध्यापर्यंत शून्य टक्के होते. मात्र मात्र 29 मार्च ते दोन एप्रिल या काळात ते वाढून 2.6 टक्क्यांवर गेले. करोना बाधितांमध्ये पुरूष आणि 50 वर्षापुढील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सारीग्रस्तांमध्ये 39.2 टक्के बाधितांनी परदेशवारी केली नाही अथवा ज्ञात बाधितांच्या ते संपर्कात ते आले नाहीत, ही थोडी चिंताजनक स्थिती आहे, असे त्यात म्हटले आहे.
सारीग्रस्तांना करोनाची बाधा महाराष्ट्रात सर्वाधिक झाली असून त्याचे प्रमाण 3.8 टक्के आहे. गुजरातमध्ये 1.6, तामिळनाडूत 0.9 आणि केरळमध्ये ते 0.2 टक्के आहे. सारीच्या रुग्णांमध्ये दर तिसऱ्या रुग्णांनंतर एक करोनाचा बाधित निघत आहे.