मुंबई – राज्यात 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येणारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
प्रा. डॉ. सावंत म्हणाले, 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून नि:शुल्क गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या हेतूने राबविण्यात येते.