नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, या महामार्गाचा हा टप्पा 520 किलोमीटर अंतराचा आहे. त्यातून नागपूर आणि शिर्डी ही शहरे जोडली जाणार आहेत. हा एकूण महामार्ग 701 किमीचा आहे.
त्यासाठी 55 हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. नागपुर आणि मुंबई ही महानगरे याद्वारे जोडली जाणार आहेत. हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागांमधून जातो.
आज तत्पूर्वी, पंतप्रधानांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि फ्रीडम पार्क ते खापरी या मेट्रोवर त्यांनी तिकीट खरेदी करून प्रवास केला. पंतप्रधान मोदींनी याच रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही केली. या एकूण मेट्रो प्रकल्पाला 6700 कोटी रूपये खर्च येणार आहे.
फ्रीडम पार्क ते खापरी या त्यांच्या प्रवासादरम्यान, पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि इतर क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी पंतप्रधानांचे नागपुरात आगमन झाले त्यावेळी तेथे त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.