उत्तरप्रदेशात सपा-बसपा युतीला लागला ब्रेक

पोटनिवडणुका स्वबळावर लढवण्याची मायावतींची घोषणा

नवी दिल्ली – बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आपण स्वबळावर लढवणार असून अखिलेश यांनी आपली कर्तव्ये पुर्ण केली तर त्यांच्याशी भविष्यातही पुन्हा आघाडी होऊ शकते असे मायावती यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाशी निर्माण झालेले आपले नाते कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. हे नाते कायम ठेवण्याचाही आपण प्रयत्न करू असेही मायावती यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजुला राजकीय अपरिहार्यतेकडे दुर्लक्ष करता येत नाही याचीही सर्वांना कल्पना आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी या दोन पक्षांत बेबनाव निर्माण झाला आहे असे त्यांच्या निवेदनातून ध्वनीत होत आहे.

समाजवादी पक्षाशी आम्ही फारकत घेतली असली तरी ती तात्पुरती आहे. भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपल्या पक्षाच्या लोकांना मिशनरी स्वरूपाचे कार्यकर्ते म्हणून परावर्तीत करू शकले तर आम्ही एकत्र येण्यात काही अडचण नाही असे त्यांनी आज पत्रकारांना सांगितले.उत्तरप्रदेशात या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी महागठबंधन केले होते. पण या आघाडीला 80 पैकी केवळ 15 जागाच मिळू शकल्या आहेत. त्यात बहुजन समाज पक्षाला दहा आणि समाजवादी पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत.

कॉंग्रेसला केवळ एक आणि अपनादल पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजपने राज्यात 62 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाची व्होंट बॅंक समजल्या जाणाऱ्या यादव समाजाची मतेही आम्हाला मिळू शकली नाहीत हे मला येथे दुर्देवाने नमुद करावे लागते आहे असेही मायावती यांनी म्हटले आहे. ज्या मतदार संघात यादव समाजाचे प्राबल्य आहे तेथेही आम्हाला पुरेशी मते मिळाली नाहीत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. डिम्पल यादव, धर्मेंद्र यादव, राम गोपाल वर्मा यांनाही आपआपल्या मतदार संघात पराभव पत्करावा लागला त्याचाही आम्हाला आता विचार करावा लागत आहे असे कारणही त्यांनी या ब्रेकअपसाठी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.