प्रवेशावरून घूमजाव; विद्यापीठ प्रवेशात “70:30′ पद्धत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार

पुणे – देशातील नामांकित विद्यापीठ म्हणून नावलौकीक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पदव्युत्तर प्रवेशाच्या निर्णयावरून “यू टर्न’ घेतला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये होणाऱ्या प्रवेशामध्ये 70:30 ही पद्धत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे विद्यापीठाने शुक्रवारी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये होणाऱ्या प्रवेशांमध्ये मागील वर्षापर्यंत परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के, तर इतर विद्यार्थ्यांसाठी 30 टक्के जागा राखीव होत्या. यावर्षीपासून राखीव जागा रद्द करून सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले करण्याचा निर्णय घेतला होता. ही नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे विद्यापीठासह राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यापीठाने यंदाची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रवेश परीक्षा दि. 15 ते 18 जूनदरम्यान होत आहे. ही प्रक्रिया गुणवत्तेला पूरक ठरण्याची चिन्हे होती.

दरम्यान, यंदा विद्यापीठाने 70:30 ही पद्धत करून प्रवेश सर्वांसाठी खुले केले. या निर्णयावरून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. पुणे, नगर आणि नाशिक या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. स्थानिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुन्हा निर्णयाचा फेरविचार केला.

या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. पुणे विद्यापीठाचे पदवी प्राप्त केलेल्या 70 टक्‍के विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशासाठी प्राधान्य राहील, असे अध्यादेशद्वारे नमूद केले. त्याचाच परिणाम म्हणून आता काही विभागामध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश पूर्ण होतील, याविषयी साशंकता आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी दि. 15 जूनपासून प्रवेश परीक्षा होत आहे. एकूण जागा 2 हजार 500 इतके आहे. त्यासाठी सुमारे 28 हजार अर्ज आले आहेत. त्यातील 400 विद्यार्थी हे राज्याबाहेरील आहे. एकूण अर्जाचा विचार करता ही संख्या फारच कमी आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.