- गरजूंना मिळेना मदत
चऱ्होली – करोनाच्या मागील वर्षाच्या पहिल्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक दात्यांनी हात पुढे केले होते. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु सध्या करोनाची दुसरी लाट आली असून भयंकर आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत दातृत्वाचा झरा आटल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
गतवर्षी करोनाचा शिरकाव झाल्यानंतर कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी गेली होती. शिवाय मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पोटाची भूक कशी भागवावी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्या वेळी मदतीसाठी अनेक दानशूर तथा समाजसेवकांचे हात पुढे आले होते. या वेळी काहींनी जीवनावश्यक वस्तूंचे तर काहींनी कपडे व फळांचे वाटप केले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी गहू, तांदूळ, दाळ, मास्क, सॅनिटायझर यांसह किराणा साहित्याचे वाटप केले होते. आरोग्य विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच महसूल विभागाने जीव धोक्यात घालून त्या वेळी काम केले होते. त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून सामाजिक संघटनांनी तसेच लोकप्रतिनिधींनी करोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार केले.
गतवर्षीपेक्षा यावर्षीची करोनाची स्थिती भीषण आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कामासाठी गावसोडून आलेल्या नागरिकांवर तसेच इतर हातमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे समाजातील मोठे उद्योजक, समाजसेवक, दानशुरांनी पुढे येऊन करोनाच्या या महामारीत होरपळत असलेल्या गरिबांना मदतीचा एक हात पुढे करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्याची गरज आहे.