पुरंदर-हवेलीत युतीत धुसफूस

एन.आर.जगताप
-मतदारसंघावर भाजप करणार दावा

-पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
-इच्छुकांची मांदियाळी

सासवड – विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या पुरंदर-हवेली मतदारसंघात तापू लागले आहे. पुरंदर-हवेली मतदार संघ हा तसा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारा मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघाकडे सध्या सर्वच पक्षांचे लक्ष लागलेले असून युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी आगमी निवडणुकीसाठी भाजप या मतदारसंघासाठी दावा करणार असल्याने या मतदारसंघात युतीत आतापासून छ्पी “धुसफूस’ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांना पुरंदर-हवेलीमधून तब्बल 95 हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे पुरंदर-हवेलीतील भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भाजपमधील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुरंदर-हवेली मतदारसंघाची जागा भाजपसाठी सोडण्याची मागणी पुरंदर-हवेली मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतीत भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठविणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या 2019 लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल या जरी पराभुत झाल्या असल्या तरी देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना घाम फोडला होता. कांचन कुल यांना 95 हजारांहून अधिक मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. त्यामुळे पुरंदर-हवेलीतील मतदारांचा कलही भाजकडे असल्याचे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पटवून दिले जात आहे. भाजपमध्ये ही इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याची चर्चा आहे. भाजपचे पुणे जिल्हा चिटणीस आर. एन. जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीश जगताप, पुरंदर भाजपचे अध्यक्ष सचिन लंबाते हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

एकंदरीत पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघावर भाजपने केलेल्या दाव्यामुळे या विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीत असलेली अंतर्गत धुसपूस वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्यपातळीवर युतीच्या आणाभाका घेतल्या जात असल्या तरी पुरंदर-हवेलीत मात्र भाजप-शिवसेना युतीला सुरूंग लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुरंदरचे आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुरंदरवर दावा केल्यामुळे शिवतारे यांची धाकधुक वाढली आहे. यामुळे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. एकंदरीतच भाजपने पुरंदर-हवेली मतदारसंघावर दावा केल्यामुळे मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.

पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून मी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे व प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे.

– आर. एन. जगताप, चिटणीस जिल्हा भाजप

राजकीय क्षेत्रात काम करीत असताना प्रत्येक कार्यकर्त्याची महत्त्वाकांक्षा असते.त्याप्रमाणे पक्षाने संधी दिल्यास पुरंदर विधानसभा मतदारसंघातून माझीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे.

– सचिन लंबाते, अध्यक्ष पुरंदर भाजप

संपूर्ण देशात आणि राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे व मतदारांची भाजपलाच पसंती आहे. त्यामुळे पुरंदरमध्येही भाजप बहुमताने विजयी होऊ शकते. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याबाबतीत आम्ही लवकर पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहोत.

– गिरीश जगताप, सदस्य, जिल्हा नियोजन समिती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)