कवठे -वाई तालुक्याच्या पूर्व भागामध्ये करोनाने आपले हातपाय वेगाने पसरायला सुरुवात केली असून बुधवारी पुन्हा नव्याने कवठे, ओझर्डे व चिंधवली या गावांमध्ये करोनाने प्रवेश केला आहे. यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राजकीयदृष्ट्या जागृत चिंधवली व ओझर्डे या गावांच्यामध्ये कोरोनो सारख्या रोगाने प्रवेश केल्याने येथील नागरिकांच्यामध्ये घबराट पसरली आहे.
बुधवारी ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, चिंधवली येथील 28 वर्षीय तरुण व कवठे येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला यांचा अहवाल पॉंझिटिव्ह आल्याने या तिन्ही गावांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाढत्या करोनाला थोपविण्यास आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासन यशस्वी झाले.
परंतु, आता या तीन गावांमध्ये नव्याने रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुणे या ठिकाणावरून काही जणांचे या गावांमध्ये आगमन झाल्यामुळे या परिसरात करोनाचा शिरकाव झाला. काही दिवसापूर्वी वेळे, कवठे व सुरूर या गावांमध्ये बाधित सापडले. मुंबई व पुणे येथून येणारा लोकांचा लोंढा थांबत नसल्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने करोनाला थोपविण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.