बॉलीवूड असो किंवा मराठी सिनेमे, मालिका असोत, मुख्य कलाकारांच्या बरोबरीने किंवा काही वेळा त्याहीपेक्षा अधिक ठळकपणाने काही सहकलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. काही वेळा त्यांना मिळालेली व्यक्तिरेखा उठावदार आणि ठळक असते, तर काही वेळा कालकार आपल्यातील अभिनयसामर्थ्याच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात. बोमन इराणी हे अशा कलाकारांपैकी एक प्रमुख नाव. आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीमध्ये बोमन यांनी अनेक चित्रपटांत महत्त्वाचे रोल केले.
पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या “83′ या चित्रपटात बोमन यांनी भारतीय क्रिकेटसंघाचे हरफनमौला यष्टिरक्षक फारुख इंजिनिअर यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. बोमन सांगतात की, मला आता अशा प्रकारच्याच भूमिका करायच्या आहेत. भविष्यात मला एखाद्या सणकी किंवा विक्षिप्त भूमिका करायला नक्की आवडतील, किंबहुना मी त्यांच्या प्रतीक्षेतच आहे.
शाहरुख खानच्या “हॅप्पी न्यू ईअर’ नंतर बोमन यांची सिनेकारकिर्द काहीशी मंदावली. ते सांगतात, की सातत्याने यश मिळत गेले की लोकांमध्ये एक प्रकारचा गर्व चढू लागतो. तसेच ते आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेरच यायला पहात नाहीत. माझी अवस्थाही तशीच काही तरी झाली आहे.