पिंपरी – भगवान महावीर यांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पुरस्कारांचे वितरण, अहिंसा रॅली, पाणपोईचे उद्घाटन, वह्यांचे वाटप आदी उपक्रम शहरात राबविण्यात आले.
पुरस्कार वितरण आनंद महिला संस्था व ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महिलांचा व आत्म कल्याणासाठी साधुत्वाचा मार्ग स्वीकारणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे व प्रमुख पाहुणे म्हणून जैन कॉन्फरन्सचे अविनाश चोरडिया, रुचिराजी सुराणा, डॉ. प्रा. अशोक पगारिया, बिबवेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सुभाष ललवाणी, प्रा. प्रकाश कटारिया, जैन महासंघाचे अध्यक्ष सुरेशजी गदिया, जैन कॉन्फरन्सचे सागर सांकला आदी उपस्थित होते.
या वेळी शारदा छाजेड, अंकिता लुनिया या भगवती जैन दीक्षा घेण्याचा निर्धार करणाऱ्या या मुमुक्षूंचा सन्मान करण्यात आला.तसेच हिराबाई ओस्तवाल, शैलजा कुलकर्णी, अचला शहा, विमल गदिया, सुगनाबाई नहार यांना माता त्रिशाला व माई रमा पुरस्काराने गौरविण्यात आले. अजमेरा मधील प्रगती महिला मंडळाने महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम साजरा केला.
या वेळी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा, स्वानंद संस्थेच्या पिंपरी चिंचवडच्या संस्थापक प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. साधना सवाने यांनी आभार मानले.
वह्यांचे वाटप
चिंचवड स्टेशन, मोहननगर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. येथील तुळजा भवानी मंदिरासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या वेळी आनंद लुंकड, आनंद पगारिया, अशोक लुंकड, छगनलाल मुथा, संतोष छाजेड, हर्षद लुंकड, राहुल लुंकड, विलास बागमार, गणेश दातीर पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सतीश मेहेर यांनी केले.
प्रीतम प्रकाश महाविद्यालय
भगवान महावीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने या महामानवांना अभिवादन करण्यासाठी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. अशोककुमार पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन पवार, प्रा. भास्कर पांडुरंग, डॉ. विजय निकम, प्रा. सुधाकर बैसाणे, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. प्रवीण मस्के, प्रा. उमेश लांडगे, डॉ. स्वाती वाघ, प्रा. विभा ब्राह्मणकर, प्रा. महालक्ष्मी शिरसाठ, प्रा. रूपाली आगळे, प्रा. प्रशांत रोकडे, राजेश कुंभार, सारिका बेलदोर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. सचिन पवार केले. प्रा. भास्कर पांडुरंग यांनी आभार मानले.