नवी दिल्ली – दिल्लीत येत्या 9 सप्टेंबर पासून होणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर एनएसजी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या बॉम्ब पथकाने आज संपुर्ण दिल्लीत घातपाताच्या संबंधात शोध मोहीम राबवली. तत्पूर्वी, शनिवारी, दिल्ली वाहतूक पोलिसांनी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या शिखर परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून आणखी एक पूर्ण ड्रेस रिहर्सल आयोजित केली होती. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 20 सदस्य राष्ट्रांसह 40 देशांचे नेते आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
एएनआयशी बोलताना दिल्ली वाहतूक पोलिसांचे विशेष आयुक्त एसएस यादव म्हणाले, “आम्ही सर्व मीडिया हाऊससह सर्वांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या संबंधातील आवश्यक माहिती आमच्या सोशल मीडिया हॅंडलवर देखील शेअर केली जात आहे. वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
ही परिषद प्रगती मैदान येथील अत्याधुनिक भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. या परिषदेच्या संरक्षणाच्या संबंधात दिल्ली पोलिसाच्या पथकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या संभाव्य धोक्यांना तोंड देण्याचेही प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यांना त्यांच्या सॉफ्ट स्किल्सवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.