पुणे – सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व ग्रंथालयामध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस (1 ऑक्टोबर) (International Senior Citizens Day) साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जेरिॲट्रिक ॲण्ड पॅलिएटीव्ह केअर स्पेशालिस्ट डॉ. प्रियदर्शनी कुलकर्णी आणि प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शिरीष लिमये यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
डॉ. प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी आवश्यक बाबी आणि घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ. शिरीष लिमये यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी काही बौद्धीक खेळ घेऊन विचार, आचार, विहार या तिन गोष्टींचा समन्वय झाल्यास ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर व संतुलीत होईल असे प्रतिपादन केले.
मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी ज्येष्ठ नागरिक केंद्राचा उपक्रम एक सामाजिक बांधीलकी म्हणून करण्यात येत असून या केंद्रात सम-विचार, समवयस्क नागरिक आपल्या अनुभवांची, कल्पनांची आणि विचारांची देवघेव करतील, असा विचार व्यक्त केला. गेली अनेक वर्षे या दिवशी ज्येष्ठ नागरीक दिन संस्थेमध्ये साजरा करण्यात येत आहे.