प्रभात वृत्तसेवा
पुणे – “विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास बाळगून कष्ट, जिद्द, चिकाटीने काम करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञनाचे प्रशिक्षण घेत त्याचा वापर करणे, ही काळाची गरजही बनलेली आहे,’ असे मत व्हिजनरी आर्टिस्ट, पब्लिकेशन डिझाइनर, एडिटर अँड डिझाइन थिंकर कमल जैन ( Design Thinker Kamal Jain ) यांनी व्यक्त केले.
विमाननगर येथील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन येथे “डिझाइन ब्रॅंडिंग’ विषयावरील “छाप’ हा राष्ट्रीय स्तरावरील सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यात कमल जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सिम्बॉयसिस इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनच्या संचालिका डॉ. संजीवनी अयाचित, कम्युनिकेशन डिझाइन विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर देसाई, प्रा. तन्मय कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी जगभरातील नामांकित वर्तमानपत्र, मॅगझिन यांच्या काही आकर्षक डिझाइन, पोस्टर्स व कंपन्यांचे लोगो यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्याचा व माहिती जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांनी आनंदही लुटला.
“वर्तमानपत्र व मॅगझिनच्या निर्मिती ते विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक ते अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन व त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जुन्या निर्मिती प्रक्रियेत कालानुरुप बदलही करावे लागले आहेत. प्रिंट जर्नालिझम, पब्लिकेशन, प्रिंटिंग, डिझाइन, पेस्टिंग, आर्किटेक्चर, फोटोशॉप यांसह अन्य बाबींचा विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करायला हवा. तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही सतत घेतले पाहिजे. याचा विद्यार्थ्यांना करियरमध्ये निश्चितपणे फायदाच होणार आहे,’ असे कमल जैन म्हणाले.
विद्यार्थ्यांनी काही नवीन शिकायचे असल्यास शून्यापासून सुरुवात करायला पाहिजे आहे. अन्य डिझाइनचा अभ्यास करावा, मात्र त्या डिझाइनची आहे तशी चोरी करुन त्याचा वापर करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण बाबींचा सतत अभ्यास करुन संशोधनाकडे वाटचाल करायला हवी. आपली कमजोरी दूर करुन सक्षमपणे आव्हानांचा सामना केलाच पाहिजे,’ असेही कमल जैन यांनी सांगितले.
वर्तमानपत्र व मॅगझिनमधील बदलते डिझाइन व त्यांचे महत्व, फोटोंचा उपयोग, इनडिझाइन यांच्यासह हिंदी, इंग्रजी, देवनागरी, उर्दू या विविध फॉन्टचीही सविस्तर माहिती जैन यांनी विद्यार्थ्यांना दिली. जैन यांनी आपल्या उल्लेखनीय कामकाजाचे अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले.