सातारा – सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत आणखी 14 करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये दत्तछाया कॉलनीतील एकाच कुटुंबातील 12 जणांचा समावेश आहे. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत आतापर्यंत 48 करोनाबाधित आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील गडकर आळी, सर्वोदय कॉलनी, शिवाजीनगर, भैरवनाथ कॉलनी तामजाईनगर, अथर्व अपार्टमेंट शाहूपुरी, तामजाईनगर, रामकुंड, दौलतनगर, समता पार्क, भैरोबा पायथा आदी भागांत करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी रात्री आलेल्या अहवालानुसार आणखी 11 बाधित वाढल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली होती.
शनिवारी आलेल्या अहवालात गडकर आळी आणि दौलतनगर असे प्रत्येकी एक रुग्ण वाढले होते. दत्तछाया कॉलनीतील एक जण करोनाबाधित आढळून आला होता. या रुग्णाच्या सहवासात आलेल्यांना क्वारंटाइन करून त्यांचे स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. यातील 12 जण बाधित आढळले असून ते सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
एकावेळी 12 बाधित सापडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. अथर्व अपार्टमेंट येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील महिला बाधित आली असून अन्य चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शाहूपुरीत 14 रुग्ण आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून 13 रुग्णांची माहिती मिळाली.
गटविकास अधिकारी किरण सायमोते, सरपंच गणेश आरडे, उपसरपंच राजेंद्र गिरी, सदस्य राजेंद्र मोहिते, ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी, राहुल खंडागळे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या वतीने हा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. शाहूपुरीमध्ये आढळलेल्या बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मोहन कोळी यांनी केले आहे.