पुणे – जिल्ह्यातील कुपोषित व अतिकुपेषित बालकांचा शोध घेतला जात असून, बालकांना चार श्रेणीत विभागले जात आहे. त्यात कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित ही श्रेणी महत्त्वाची आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 12 हजार 318 बलकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून 1 हजार 289 बालके मध्यम कुपोषित तर 371 बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहेत.
करोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील दोन लाख 12 हजार 318 बालकाची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून मॅम श्रेणेतील म्हणजेच मध्यम कुपोषित एक हजार 289 बालके आढळली आहेत. तर अतितीव्र कुपोषित श्रेणीतील 371 बालके आढळली आहेत. तर उर्वरित बालके निरोगी असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक यांचा समावेश असलेले पथक बालकांची तपासणी करत आहेत. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.
जिल्ह्यात बालकांचा तपासणी केली जात असून, त्यातून मॅम आणि सॅम बालके आढळली आहेत. त्या बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार पुरविण्यात येणार आहे. अजूनही मुलांची तपासणी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून आहार पुरवठा केला जाणार आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.