मुंबई – कोरोना चाचणी दराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात 200 रूपये कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी 980 रूपये, 1 हजार 400 रूपये आणि 1 हजार 800 रूपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिली आहे.
नव्या सुधारित दरापेक्षा अधिक दर खासगी प्रयोग शाळांना आकारता येणार नाहीत. 4 हजार 500 रूपयांवरून 980 रूपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करण्यात आल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
कोरोना चाचणीचे दराचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रूपये दर आकारण्यात येईल. रूग्णालयात, कोविड सेंटरमध्ये किंवा क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळेतून सॅम्पल गोळा करून तपासणी करण्यासाठी 1 हजार 400 रूपये तर, रूग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रूपये असा कमाल दर निश्चित कण्यात आला आहे, असेही टोपे यांनी सांगितले आहे.