कोल्हापुर: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात सुद्धा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील काही ही सिन प्रमाणे चित्र पाहायला मिळाले. या चित्रपटात ज्याप्रकारे अभिनेता मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी उभा असतो आणि अखेरच्या क्षणाला तो उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर घेऊन येतो आणि चिल्लर मोजण्यासाठी गडबड होते असाच काहीसा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडला आहे. हातकलंगले मतदारसंघातील एकाा उमेदवाराने अशी चिल्लर देऊन निवडणूक प्रशासनाचे धांदल उडून दिली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून सुमारे साडेसतरा हजारांची नाणे भरली. त्यामुळे ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.पन्हाळकर यांनी काही नोटा आणि बाकीची चिल्लर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला.अर्ज भरण्यास पंधरा मिनिटांचा वेळ शिल्लक होता त्याच वेळी पन्हाळकर यांनी कार्यालयांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही चिल्लर मोजण्यासाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला. दुपारी तीन नंतर बंद होणारी प्रक्रिया काल मात्र पाच वाजेपर्यंत सुरू होती. किशोर पन्हाळकर हे दिव्यांग आहेत लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मित्रांनी काही रक्कम जमा केली. यामध्ये एक रुपये दोन रुपये पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. तर काही नोटा देखील पन्हाळकर यांनी भरल्या आहेत. दीड तास अनामत रकमेची मोजणी सुरू होती. त्यानंतरच पन्हाळकर यांना अनामत रकमेची पावती देण्यात आली. मात्र याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर झाली.