हजारो लिटर पाणी वाया
पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – रामनगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. ३१) पहाटे जलवाहिनी फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या रामनगर, चिंचवड येथील सहजीवन कंपनीसमोर जलवाहिनी फुटली. यामुळे आठ ते दहा फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडत होते. जलवाहिनी फुटल्यामुळे रामनगर परिसर जलमय झाला आहे. सकाळी उशिरापर्यंत पाणी वाया जात होते.
सध्या पिंपरी चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन नागरिकांना वारंवार हात धुण्याचा सल्ला देत आहे. अशा स्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी केले आहे.