“एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा’- राज ठाकरे

राज ठाकरेंनी केलं 'या' मराठी चित्रपटाचं जोरदार कौतुक

मुंबई – मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार मानले गेलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. एक दंतवैद्य ते मराठी नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नट असा डॉ. घाणेकर यांचा प्रवास या चित्रपटात दाखविला गेला आहे.

महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणजेच, अभिनेता ‘सुबोध भावे’ याने या चित्रपटात डॉ. घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारली होती. काशिनाथ घाणेकर यांचा लूक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने या चित्रपटात साकारले. त्यामुळेच डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाने तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घातला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे यांनी’ बघितला आणि त्यांनाही चित्रपटचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. हा चित्रपट बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी एक पोस्ट ट्विट करून चित्रपट आणि कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा जरी 2018 ला रिलीज झाला होता, तरी माझा पहायचा राहुन गेला होता. पण बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही, त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला,’ असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

आज चित्रपटात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओके, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक! असं देखील राज म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.